डॉक्टरांवरील हल्ल्याच्या टोळीचा पर्दाफाश! महागाव पोलिसांची मोठी कारवाई; पाच आरोपी ताब्यात, उर्वरितांचा शोध सुरू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे : महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करून रुग्णालयासह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तोडफोड करणाऱ्या टोळीविरुद्ध महागाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात योगेश खंदारे, आकाश आडेकर आणि एका विधीसंघर्ष बालकासह पाच जणांना २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
१० ते १२ जणांचा रुग्णालयात धुडगूस
रात्रीच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने महागाव ग्रामीण रुग्णालयात प्रवेश करून दहशत निर्माण केली होती. हल्लेखोरांच्या आक्रमक वर्तनामुळे महिला डॉक्टर व परिचारिकांना जीव वाचविण्यासाठी बाथरूममध्ये लपून बसावे लागले होते.
यावेळी नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करण्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरच्या दरवाजांचीही तोडफोड करण्यात आली होती. घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
चार पथकांकडून तपास
घटनेनंतर आरोपींच्या अटकेसाठी महागाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विविध ठिकाणी शोध घेत संशयितांचा माग काढण्यात आला. अखेर तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.
ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम शेख, एपीआय सुनील अंबुरे, एपीआय किशोर मुरकुटे यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.
मुख्य आरोपीसह इतरांचा शोध सुरू
या प्रकरणातील मुख्य आरोपीसह काही हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
“या प्रकरणातील कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही. मुख्य आरोपीसह इतर आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तपास सुरू असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली.
दरम्यान, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी झालेल्या या कारवाईनंतर उर्वरित आरोपी कधी जेरबंद होतात, याकडे महागाव तालुक्यासह आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



