तहसीलदारांच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतरही कारवाई नाही; महागाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वडद येथील वहिवाट रस्त्याच्या वादग्रस्त प्रकरणात तहसीलदार, महागाव यांनी संबंधित तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असतानाही अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याने महागाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तहसीलदार कार्यालयाने ३ जुलै २०२६ रोजी महागाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना पाठविलेल्या पत्रात उपविभागीय अधिकारी उमरखेड, नायब तहसीलदार महागाव तसेच दिवाणी न्यायालय, महागाव यांच्या आदेशानुसार मौजे वडद येथील सर्वे क्रमांक १६३ मधील वहिवाट रस्ता २१ जून २०२६ रोजी खुला करून देण्यात आल्याचा उल्लेख आहे.
मात्र, अर्जदार बाबाराव रामराव जराड यांनी संबंधित रस्ता पुन्हा अडविण्यात आल्याची तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी कोडबा बळीराम वाघे, उत्तमराव माधवराव गावंडे आणि बाबाराव पुंजाराम टाकळकर (रा. वडद, ता. महागाव) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
तहसीलदारांच्या पत्रात संबंधितांनी तहसील कार्यालयाच्या २४ मे २०२२ च्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा उल्लेख असून तातडीने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. या पत्राची प्रत उपविभागीय अधिकारी, उमरखेड तसेच अर्जदार बाबाराव जराड यांनाही पाठविण्यात आली आहे.
मात्र, अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, ३ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांचे पत्र महागाव पोलीस ठाण्यात पोहोचूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे “तहसीलदारांच्या लेखी आदेशावरही कारवाई का होत नाही?” असा सवाल अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात महागाव पोलिसांची भूमिका काय आहे, गुन्हा दाखल करण्यास विलंब का होत आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही कधी होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



