महागाव नगरपंचायतीच्या घनकचरा निविदेवर आक्षेप; प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ती नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता उत्तमराव नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व मुख्याधिकारी, नगरपंचायत महागाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, महागाव नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 31 मार्च 2026 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ती चार महिन्यांसाठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी प्रशासकीय मान्यतेतील नियमांकडे दुर्लक्ष करून जाचक अटी घालून निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, ₹1,27,00,000 किंमतीची निविदा काढून कंत्राटदार व नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा तसेच कमिशनची मागणी होत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी विद्यमान निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



