चिंचेच्या झाडाला घेतला गळफास; हिमायतनगर येथील ‘एकलव्य स्टडी सर्कल’चे संचालक एन. टी. जाधव यांची आत्महत्या

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी – शेख खय्यूम):
येथील नामांकित ‘एकलव्य स्टडी सर्कल’चे संचालक प्रा. एन. टी. जाधव यांनी कोचिंग क्लासेसच्या परिसरात चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रा. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून एकलव्य स्टडी सर्कलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत होते. आज पहाटे त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
जाधव यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे अचूक कारण अद्याप समोर आले नसून घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. हिमायतनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.



