महाभ्रष्टाचार : हिमायतनगर नगरपंचायतीत नळ जोडणीच्या नावाखाली उघड्याडोळ्यांनी लूट! अधिकृत शुल्कानंतरही २ हजारांची बेकायदेशीर वसुली; अजिम हिंदुस्तानींचा थेट हल्लाबोल!

(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
हिमायतनगर : स्थानिक नगरपंचायतीचा भोंगळ कारभार आणि नागरिकांची चाललेली आर्थिक लूट आता चव्हाट्यावर आली आहे. नवीन नळ जोडणीसाठी अधिकृत कोटेशननुसार सुमारे २,००० रुपयांचे शासकीय शुल्क भरल्यानंतरही, प्रत्यक्ष नळ जोडणी करताना आणखी २,००० रुपयांची उघड मापे घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यात सर्वात गंभीर बाब म्हणजे, नगरपंचायत प्रशासन नागरिकांना केवळ अधिकृत २,००० रुपयांचीच पावती देत आहे. प्रत्यक्ष जोडणीच्या वेळी जबरदस्तीने वसूल केल्या जाणाऱ्या दुसऱ्या २,००० रुपयांची कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे पावतीशिवाय घेतली जाणारी ही अतिरिक्त रक्कम नक्की कोणाच्या खिशात आणि कोणाच्या मर्जीने जात आहे, असा खळबळजनक प्रश्न आता उपस्थित झाला असून यात मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय बळावला आहे.
या सरळ सरळ लुटीवर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट सवाल केला आहे की, जर हा पैसा अधिकृत आहे तर याची पावती का लपवली जातेय? इतर कोणत्याही सरकारी खात्यात एकाच कामासाठी दोनदा पैसे उकळले जात नाहीत, मग हिमायतनगर नगरपंचायतीतच हा पावतीशिवाय पैसे गोळा करण्याचा काळा धंदा कोणी सुरू केला, असा तीव्र प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
या गंभीर गैरप्रकारावर सामाजिक कार्यकर्ते अजिम हिंदुस्तानी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी प्रशासनाला तात्काळ जाहीर स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे. पावती न देता होणारी ही २ हजारांची वसुली कोणाच्या हिश्श्यात जात आहे याचा खुलासा करावा, अन्यथा या भ्रष्टाचाराविरोधात नगरपंचायतीच्या दारात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा हिंदुस्तानी यांनी दिला आहे



