शहर

पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; मुख्याधिकार्‍यांना नळ जोडणीसाठी निवेदन एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या घोषणा; तर दुसरीकडे ३४५ चिमुरड्यांना पाण्यासाठी वणवण, हिमायतनगर

नगरपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर!
(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम)
​हिमायतनगर: येथील ‘पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, नई आबादी’ या शाळेतील विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, शाळेला त्वरित नवीन नळ जोडणी मंजूर करावी, या मागणीसाठी आज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
​याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर येथील नई आबादी भागातील या जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये एकूण ३४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेला अधिकृत आणि पुरेशा पाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे या चिमुरड्या विद्यार्थ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र भटकंती करण्याची वेळ आली असून पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे.
​देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देऊन मुलींच्या शिक्षणावर मोठा भर दिला आहे. मात्र, हिमायतनगर नगरपंचायत प्रशासन त्याच मुलींना साध्या पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवत आहे. शाळेत नवीन नळ जोडणी करून पाणी देण्याची साधी सोय नगरपंचायत करत नसल्याने, या ३४५ मुला-मुलींनी शिक्षण कसे घ्यावे? नगरपंचायतीची ही अनास्था अत्यंत संतापजनक असून प्रशासनाने या चिमुरड्यांची चालवलेली चेष्टा थांबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
​विद्यार्थ्यांचे हे हाल थांबवून त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी वेळेत मिळावे, यासाठी मुख्याध्यापक मोहम्मद सरफराज यांच्या स्वाक्षरीने आज नगरपंचायत प्रशासनाला साकडे घालण्यात आले. आपल्या स्तरावरून तातडीने या शाळेसाठी नवीन नळ जोडणी (नळ कनेक्शन) मंजूर करून द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
​निवेदन देतेवेळी शाळेचे अध्यक्ष सालीम शेवालकर, शेख खय्यूम सदस्य तथा पत्रकार
शेख यूसुफ आणि हिमायत नगरची बुलंद आवाज शेख सलीम यांच्यासह स्थानिक नागरिक व शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आता या संवेदनशील विषयावर नगरपंचायत प्रशासन किती जलद गतीने पावले उचलते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button