रमेश चव्हाण हल्ला प्रकरणाची SIT चौकशी करा; शिवसेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, सूत्रधारांवर कारवाईची मागणी

यवतमाळ | येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना यवतमाळ जिल्ह्याने व उमरखेड शहर व तालुका चे पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर नागोराव लिंगनवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात, केवळ अटक आरोपींवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न न करता हल्ल्यामागील खरे सूत्रधार, आर्थिक पुरवठादार व कट रचणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 16 जून 2026 रोजी उमरखेड येथे रमेश चव्हाण यांच्यावर नियोजनबद्ध पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी SIT नेमणे अत्यावश्यक असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
शिवसेनेने निवेदनात असा संशय व्यक्त केला आहे की, या हल्ल्यामागे अवैध रेती उत्खननाशी संबंधित हितसंबंध, स्थानिक दबावगट व काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असू शकतो. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक, तांत्रिक व गुन्हेगारी दृष्टिकोनातून तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच फिर्यादी रमेश चव्हाण यांची पुनर्जबानी घेऊन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कटकारस्थान, प्राणघातक हल्ला व इतर गंभीर कलमांनुसार तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेनेचे पुढील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
यवतमाळ जिल्ह्याचे पदाधिकारी व उमरखेड शहराचे पदाधिकारी उमरखेड तालुक्यातले पदाधिकारी
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी रमेश चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून, हल्ल्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
“फक्त हल्लेखोर नव्हे तर हल्ल्याची सुपारी देणारे, कट रचणारे आणि संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनामुळे रमेश चव्हाण हल्ला प्रकरणाला नवे राजकीय व कायदेशीर वळण मिळाले असून, आता पोलीस प्रशासन SIT चौकशीबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



