विशेष

जीपीएसच्या मागावर तेलंगणाहून आलेले पथक महागावात धडकले; ‘थार’च्या मालकी हक्काच्या वादातून भर बाजारपेठेत तुफान राडा

वाहन चोरीचे असल्याचा आरोप; वाहतूक ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी तेलंगणा राज्यात नोंदणीकृत असलेल्या थार (TS 08 JU 5798) वाहनाच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. जीपीएस ट्रॅकिंगच्या मदतीने वाहनाचा शोध घेत तेलंगणाहून आलेल्या पथकाने वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आणि काही क्षणांतच त्याचे रूपांतर भर बाजारपेठेतील राड्यात झाले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

माहितीनुसार, संबंधित थार वाहन मूळतः हैदराबाद येथील जसवंत रेड्डी यांच्या नावावर नोंदणीकृत होते. त्यानंतर ते निजामोदिन हुसेन सय्यद यांना विकण्यात आले. पुढे हे वाहन भाडेतत्त्वावर इम्रान नावाच्या व्यक्तीकडे देण्यात आले आणि नंतर अमीर या व्यक्तीच्या ताब्यात गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आर्थिक व्यवहारातून हेच वाहन उमरखेड परिसरातील एका व्यक्तीकडे सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांमध्ये गहाण ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या व्यवहारांपैकी कोणताही व्यवहार आरटीओ कार्यालयात अधिकृतपणे नोंदविण्यात आलेला नव्हता.

वाहनाचा माग काढणे कठीण झाल्याने निजामोदिन हुसेन सय्यद यांनी वाहनात बसविण्यात आलेल्या जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. शुक्रवारी वाहनाचे लोकेशन महागाव शहरात मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह येथे दाखल झाले.

यावेळी वाहन महागाव येथील इब्राहिम बागवान यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले. वाहन ताब्यात घेण्याच्या प्रयत्नावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणांतच तुंबळ हाणामारीत झाले. भर बाजारपेठेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी नियमित पोलीस बंदोबस्त नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही मोबाईल चोरी, मारामाऱ्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे बाजारपेठेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही पुरेसा बंदोबस्त नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

प्राथमिक टप्प्यात जमादार एडतकर घटनास्थळी पोहोचले. ते सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याने सुरुवातीला उपस्थितांकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काही काळ गोंधळ कायम राहिला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या घटनेनंतर महागाव शहरात विशेषतः शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढती गर्दी आणि वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. प्राथमिक तपासात हा वाद वाहनाच्या मालकी हक्क, कथित चोरी आणि गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झाल्याचे समोर आले आहे. वाहनाचा कायदेशीर मालक कोण, विविध व्यक्तींपर्यंत ते कोणत्या व्यवहारातून पोहोचले आणि आर्थिक देवाणघेवाण नेमकी कशी झाली याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. परंतु गुन्हे दाखल झाली नाही.

जीपीएसच्या मदतीने तेलंगणाहून आलेल्या पथकामुळे सुरू झालेला हा वाद भर बाजारपेठेत थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने महागाव शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतु कोणावरही कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले नाही .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button