शहर

वीजतारांच्या घर्षणाने तीन एकर गहू जळून खाक दोन लाखांचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड, दि. १० : तालुक्यातील नागापूर रूपाला शिवारात मंगळवारी दहा मार्चला दुपारी चारच्या सुमारास लोंबकळणाऱ्या जिवंत वीजतारांच्या घर्षणातून उडालेल्या ठिणगीमुळे तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे उभे पीक सुदैवाने आगीपासून बचावले आहे.

नागापूर रूपाला शिवारात रेहाना सय्यद अख्तर आणि रोहित तामसकर यांची शेती आहे. रेहाना यांच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या जिवंत तारा खूप खाली लोंबकळत होत्या. मंगळवारी जोराचा वारा सुटल्याने या तारांचे एकमेकांशी घर्षण झाले आणि उडालेल्या ठिणग्या थेट खालील गव्हावर पडल्या. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. उपस्थित शेतकरी आणि मजुरांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. या भीषण दुर्घटनेत रेहाना अख्तर यांचा दोन एकर आणि रोहित तामसकर यांचा एक एकर असा एकूण तीन एकर गहू जळून पूर्णपणे नष्ट झाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button