Uncategorized

राष्ट्रीय सेवा योजना व कृषी महाविद्यालय, उमरखेड तर्फे पोफळी येथे रक्तदान, रक्तक्षय चाचणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सहसंपादक शेख मुजाहिद

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद संचालित कृषी महाविद्यालय, उमरखेडच्या वतीने मौजे पोफाळी (ता. उमरखेड) येथे ३० डिसेंबरपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) विशेष शिबीर सुरू आहे. या शिबिराअंतर्गत दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान, रक्तक्षय (ॲनिमिया) चाचणी आणि भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व सेवेचे संस्कार रुजावेत, तसेच युवाशक्तीचा उपयोग राष्ट्रसेवेसाठी व्हावा, या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या निर्देशानुसार “पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान” या ब्रीदवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) हे विशेष शिबीर राबवण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेंबडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.. एस. के. चिंतले होते. तसेच व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक मा. सुरेश शिंदे, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील बी.टी.ओ. डॉ. आकाश बरदावळ, समाजसेवा अधीक्षक श्री. अंकज अंबाळे आणि रक्तपेढी विभागाची चमू उपस्थित होती.
मार्गदर्शनपर भाषणात ठाणेदार निलेश शेंबडे यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे आवाहन करून ‘सायबर क्राईम’ बद्दल सजग राहण्याच्या सूचना दिल्या. या शिबिरात ४० विद्यार्थी व २० ग्रामस्थांची रक्तक्षय चाचणी करण्यात आली. तसेच ३२ स्वयंसेवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ९० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी मा. व्ही. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. बी. पवार, डॉ. एस. बी. मातीखाये, डॉ. एम. बी. भालाधरे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे ४० स्वयंसेवक आणि पोफळी येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button