शहर

महागाव तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाटविद्यार्थी, नागरिक भयभीत — प्रशासनाचा बंदोबस्त कोलमडला

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाव शहर तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असून नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींचा बंदोबस्त पूर्णपणे अपुरा ठरत आहे.

महागाव शहरात गेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांनी दोन ते तीन नागरिकांना चावा घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यात लहान मुले आणि वयोवृद्ध अधिक प्रभावित होत असून पालकांमध्ये चिंता वाढत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना सकाळ-सायंकाळ रस्त्यावरून जाणे धोकादायक ठरत आहे.

दरम्यान, मुडाणा गावातही परिस्थिती गंभीर असून एका दिवसात सुमारे १० ते १५ नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात घबराट पसरली असून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरपंच, सचिव यांच्याकडून ठोस उपाययोजना अजूनही न दिसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

शासनाने नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींना कुत्र्यांच्या नसबंदीबाबत, तसेच पकड मोहीम राबविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असूनही प्रत्यक्षात कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नसबंदी न झाल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वेगाने वाढू लागली असून टोळक्यांनी गल्ली–बोळ व्यापायला सुरुवात केली आहे.

सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हातात काठी घेऊन बाहेर पडावे लागत आहे. अनेक ठिकाणी टोळक्यांनी रस्त्यावर अडवून ठेवण्याच्या घटना घडत असून परिसरातील वातावरण असुरक्षित झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

महागाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हे काम कोणत्या अधिकाऱ्याच्या जबाबदारीत येते, याबद्दलही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीचा विशेष मोहीम हाती घेऊन विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीवित सुरक्षित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button