शहर

महागाव नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन ठप्प सत्ताधारी–विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप; नागरिकांमध्ये संताप, आरोग्य धोक्यात

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव : ‘स्वच्छ भारत’च्या घोषणा आणि बॅनरपुरते स्वच्छतेचे स्वप्न; प्रत्यक्षात मात्र महागाव नगरपरिषद हद्दीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी, चिखल, डासांचा उपद्रव आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांत वाढ झाल्याचे स्थानिक डॉक्टर सांगत असून, प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी आहे.

स्वच्छता कामासाठी तब्बल २४ लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मैदानात कोणतीही प्रभावी स्वच्छता होत नाही. केवळ जिओ-ट्रॅकिंगद्वारे फोटो काढून बिल उचलण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या कामावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस-शिवसेना सत्ताधारी नगरपालिका आणि भाजप विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असताना, नागरिक मात्र घाणीच्या साम्राज्यात जीवन जगण्यास मजबूर आहेत.

विरोधक भाजपने जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियानाची घोषणा केली होती. मात्र, ही मोहीम केवळ एका दिवसापुरतीच मर्यादित राहिली. “दुसऱ्याच दिवशी पुन्हा कचरा ढिगारे तसेच दिसले. हे अभियान फोटोशूटपुरते होते,” असा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

दरम्यान, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. फक्त निवडणुकीवेळी घरापर्यंत येऊन मत मागणाऱ्या, पण पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना यावेळी डबल संधी नाही, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत. “काम करा नाहीतर बाहेरचा रस्ता” असा जनमताचा सूर आहे.

शहरातील काही वॉर्डांमध्ये अंदाजे २५०० बाहेरगावातील मतदारांची नावे मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवकांनी केला असून, या नावांची छाननी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. “मतदार याद्यांतील गैरप्रकार रोखले नाहीत तर पारदर्शक निवडणुकीचे काय?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सध्या नागरिकांमध्ये ‘जनतेतून नगराध्यक्ष’ निवडण्याचे आहे. स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार आणि नागरिकांना सुविधा देणारा उमेदवार हवा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. “पक्ष कोणता हे महत्त्वाचे नाही; काम करणारा नेता हवा,” असा तरुण मतदारांचा आवाज आहे.

शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचा साम्राज्य आणि डासांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महागाव आज ‘घनकचरा व्यवस्थापनात अपयशी नगरपालिका’ म्हणून ओळखली जात आहे. पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार असून, जनतेचा खरा सेवक कोण आणि फक्त फोटोसेवक कोण, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button