काळी दौलत खान पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट; नागरिक आंदोलनाच्या तयारीत!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी (दौलत खान) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार क्लब, अवैध गुटखा विक्री आणि गांजाची तस्करी यांसारख्या अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. ही मोठी बाजारपेठ असूनही, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आणि कथित साटेलोटे यामुळे परिसरातील गुन्हेगारी वाढली आहे.
पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह:
गांजाचे माहेरघर: या भागात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांवर कारवाई होऊनही, काळी (दौ.) गांजाचे माहेरघर बनले आहे. नागपूर, मुंबई, नांदेड येथून गांजा खरेदीसाठी मोठे व्यापारी येथे येत असल्याचे उघडकीस आले आहे.
‘उत्पन्नाचे तोस्त्र’: अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात ‘उत्पन्नाचे तोस्त्र’ मिळत असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
LCB ची भूमिका: जिल्हा विशेष शाखा (LCB) देखील या अवैध धंद्यांवर कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे.
शॉर्टकट रस्ते: काळी (दौ.) येथून दिग्रस, पुसद, माहूरकडे जाणाऱ्या शॉर्टकट रस्त्यांवरून अवैध गुटखा आणि गांजाची सर्रास वाहतूक होत आहे.
नागरिकांचा इशारा:
गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चोरीचे प्रमाण वाढल्याने संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वारंवार निवेदने देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे, हे अवैध धंदे बंद न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकारी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन अवैध धंदे बंद करतील का, याकडे आता महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.



