धानोरा (सा) येथील घरकुल व विकासकामांतील गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करा अन्यथा उपोषणाचा इशारा – संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड

उमरखेड | प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील धानोरा (सा) येथे प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), स्मशानभूमीकडे जाणारा सीसी पोहोच रस्ता तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड यांनी दिला आहे.
धानोरा (सा) येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्यांना लाभ न देता, काही मर्जीतील व्यक्तींना हाताशी धरून संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांनी संगनमताने घराचे कोणतेही बांधकाम न झालेल्या लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे गावातून स्मशानभूमीकडे जाणारा पोहोच रस्ता केवळ कागदोपत्री दाखवण्यात आला असून, प्रत्यक्षात सीसी रोड मंजूर असतानाही आजतागायत काम करण्यात आलेले नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम हे संबंधित सरपंच व ग्रामसेविका स्वतःच करत असून, सदर काम इस्टिमेटमधील मापदंडानुसार न करता अत्यंत निकृष्ट व तात्पुरत्या स्वरूपात (थातूरमातूर) केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा उघडपणे अपहार होत असून, याबाबत सामान्य नागरिकांनी विचारणा केल्यास ग्रामसेविकेमार्फत त्यांच्या मर्जीतील व्यक्तींमार्फत धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या सर्व गैरप्रकारांमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आर.ई. (R.E.) यांचे संगनमत असल्याने शासन निधीचा गैरवापर झाला आहे, त्यामुळे सर्व संबंधितांवर तात्काळ फौजदारी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भातील सविस्तर निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांना देण्यात आले असून, तात्काळ चौकशी व कार्यवाही न झाल्यास संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असल्याचे समजते.



