महादेव मंदिराजवळील बंधारा दुर्लक्षित; लोखंडी गेट बसवून पाणी साठवण सुरू करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महादेव मंदिराजवळ उभारण्यात आलेला बंधारा लोखंडी गेट चोरीला गेल्यानंतर अनेक वर्षांपासून निष्प्रभ ठरला असून, त्याची दुरुस्ती करून पुन्हा पाणी साठवण सुरू करावी, अशी मागणी महागावकरांनी केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष असताना चौधरीसाहेब व संभाजी नरवाडे यांच्या प्रयत्नातून हा बंधारा उभारण्यात आला होता. सध्या बंधाऱ्याची रचना सुस्थितीत असतानाही केवळ लोखंडी गेट नसल्याने तो वापरात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पूर्वी या बंधाऱ्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने नागरिक, शेतकरी व लहान मुलांना त्याचा मोठा फायदा होत होता. तसेच माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यकाळात नगरपंचायतीमार्फत बंधाऱ्याजवळ घाट बांधकाम करण्यात आले होते; मात्र पाणी नसल्याने त्या सुविधेचाही उपयोग होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
नवीन बंधारा उभारण्यापेक्षा विद्यमान बंधाऱ्याचे दुरुस्तीकरण करून त्याला नवीन लोखंडी गेट बसवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी, अतुल शिंदे, सुनील भरवाडे, बाळू नरवाडे व ग्रामस्थांनी केली आहे.



