सवना व तांड्यातील गावठी दारू विक्री तात्काळ बंद करा दारूमुक्तीसाठी महिलांचे महागाव पोलिसांना निवेदन; कारवाईचे आश्वासन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना गाव व परिसरातील तांड्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेली गावठी दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी गावातील महिला व नागरिकांनी महागाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची विक्री होत असल्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. दारूच्या व्यसनामुळे महिला व मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून गावातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.
सवना गाव व तांड्यातील गावठी दारू विक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी महागाव पोलिसांकडे केली आहे. या मागणीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रभारी ठाणेदार आंबुरे यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत तात्काळ बंदोबस्त करून गावठी दारू विक्रीवर आळा घालण्याचे व दारूमुक्तीसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील दारूबंदी आणि महिलांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.



