निवेदन देऊनही उमरखेड आगार व्यवस्थापक कुंभकर्णी झोपेत.

शाळेच्या वेळेत बस न मिळाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको.
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील पोफाळी कारखाना बस स्टॉप येथून उमरखेड येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक उमरखेड यांना वारंवार निवेदन देऊनही बस सेवा वेळेत न मिळाल्याने वैतागून गेलेल्या विद्यार्थ्यांनी यापुढे बस सुविधा वेळेवर न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिनांक १८ डिसेंबर २३ रोजी आपल्या निवेदनातून दिला होता. परंतु निवेदन देऊन दोन दिवस उलटली तरीही कुंभकर्ण झोपेत असलेल्या आगार व्यवस्थापक उमरखेड यांना जाग आली नाही. बस फेऱ्यामध्ये कोणताही बदल केला नाही.
आज दिनांक २० डिसेंबर २३ रोजी विद्यार्थी रोजच्या प्रमाणे शाळेत जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता पासून बस स्टॉप कारखाना येथे बसची वाट पाहत बसले. परंतु अकरा वाजेपर्यंत कोणतीही बस उपलब्ध झाली नाही.अकराच्या दरम्यान एक बस आली परंतु ती बस पण थांबायला तयार नसल्याचे पाहून अखेर विद्यार्थ्यांनी रास्ता अडवला. त्यावेळी बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांना चालक आणि वाहक यांनी बसमध्ये घेण्यास विरोध केला. त्यामुळे विद्यार्थ्याने बराच वेळ रस्ता रोको केला. अखेर पोफाळी पोलीसांनी बस मध्ये विद्यार्थ्यांना जागा करून दिली. त्यानंतर विद्यार्थी उमरखेडला शाळेला गेले. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्नाची पराकाष्टा करून आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो ही एक लाजिरवाणी गोष्ट. जोपर्यंत शाळेच्या वेळेत सुरळीत बससेवा उपलब्ध होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करतच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. आता तरी आगार व्यवस्थापक उमरखेड यावर योग्य निर्णय घेतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे.