रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
चिचपाड शेत शिवारातील घटना
काळी दौलत वनपरिक्षेत्र हद्दीतील चिचपाड शेतशिवारात मका पिकाची कापणी करत असताना तीन रानडुकरांनी शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. १६ मे) दुपारी सुमारे १२ वाजता घडली.
जखमी शेतकऱ्याचे नाव गोकुळ प्रेमसिंग जाधव (वय ३५, रा. चिचपाड ता. महागाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ जाधव हे आपल्या शेतातील सर्व्हे नं. ३७ मध्ये मका पिकाची कापणी करत होते. त्यावेळी अचानक तीन रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गोकुळ जाधव यांना उपचारासाठी पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे तसेच जखमी शेतकऱ्यास तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



