Uncategorized

गडचिरोलीच्या व्यक्तीस गुप्तधनाच्या आमिषाने 11 लाखांचा गंडा; 7 आरोपी फरार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दहिसावळी रोडवरील घटनेने खळबळ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एक आरोपी जेरबंद
महागाव : महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील दहिसावळी रोड परिसरात गुप्तधनातील सोन्याचे कॉइन स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवत गडचिरोली येथील एका व्यक्तीस तब्बल 10 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली असून उर्वरित सात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
फिर्यादी संदीप रामचंद्र खोब्रागडे (वय 34, रा. गडचिरोली) यांना काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून गुप्तधनातून मिळालेले सोन्याचे कॉइन कमी किमतीत विकत देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना महागाव तालुक्यातील दहिसावळी रोड परिसरात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी त्यांच्याकडील 10 लाख 80 हजार रुपयांची रक्कम घेतली. दरम्यान टोळक्यातील काही जणांनी बनावट पोलीस असल्याची बतावणी करत रेड टाकण्याचे नाटक केले. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने तेथून पळ काढला. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महागाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या प्रकरणी महागाव पोलिसांनी अपराध क्रमांक 216/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत पिंपळगाव येथील विठ्ठल पांडुरंग पवार (वय 34, रा. पिंपळगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून फसवणुकीतील 2 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी महागाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तथापि, या टोळीतील इतर सात आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात स.पो.नि. धीरज बांडे, पो.उ.नि. शरद लोहकरे तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
ऊटी घरफोडी प्रकरणाचाही तपास रखडला
दरम्यान, महागाव तालुक्यातील ऊटी येथे 2 मे रोजी मध्यरात्री झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात चोरट्यांनी गजानन मेडिकलचे संचालक राजू गावंडे यांच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर फिंगरप्रिंट तज्ञ, स्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र पंधरवडा उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही.
नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी महागाव परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button