आरोग्यशहर

उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा

एस पी दळवी
उमरखेड
दि.१६ मे २०२६
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय, यवतमाळ व उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदाची थीम: लोकसहभागातून डेंग्यू नियंत्रण
“साठवलेल्या पाणी साठ्याची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि भांडी झाकून ठेवा” या मुख्य संदेशासह यंदाचा डेंग्यू दिन साजरा होत आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. “डेंग्यूपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करा” हा मुख्य उद्देश आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयाने नागरिकांसाठी खालील प्रमाणे ५ सोपे उपाय सांगितले आहेत:
१) पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवा.
२) आठवड्यातून एकदा साचलेले पाणी काढून टाका.
३) पाण्याची टाकी, कुलर, फुलदाणी नियमित स्वच्छ करा.
४) नको असलेल्या वस्तू जसे टायर, बाटल्या, डबे योग्य प्रकारे नष्ट करा.
५) पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, मच्छरदाणीचा वापर करा.

लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका
ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे, सांधे व स्नायू दुखणे, अंगावर पुरळ येणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय उमरखेडचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले, “डेंग्यूचा डास अस्वच्छ पाण्यात वाढतो त्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी प्रतिबंधात्मक लस आहे. स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. डेंग्यूला थारा देऊ नका!”असे प्रतिपादन त्यांनी केले.

या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी पथनाट्य, रॅली आणि घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य कर्मचारी परिचारिका व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button