नगर पंचायतचा ‘ब्रिटीश’ अवतार; रहीम मशीद परिसरातील गरीब वस्त्यांवर अन्याय, प्रशासनाचा तीव्र निषेध!

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खयुम): शहरात सगळीकडे नवीन बोअरवेलची कामे जोमाने सुरू असताना, रहीम मशीद आणि ड्रीम बारच्या मागील ३-४ गल्ल्यांना जाणीवपूर्वक का वगळण्यात आले? या भागात प्रामुख्याने मातम समाज आणि गरीब मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असल्यानेच नगर पंचायत दुजाभाव करत आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. येथील परिस्थिती पाहता जनता आजही एखाद्या पारतंत्र्यात जगत असल्याचे भासत आहे.
केबिनमध्ये बसून पगार लाटणे बंद करा!
”आम्ही कर भरतो, मग आम्हाला सुविधा का मिळत नाहीत?” अशा शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. नगर पंचायतचे अधिकारी कधीही वॉर्डात येऊन पाहणी करत नाहीत, ते केवळ एसी केबिनमध्ये बसून पगार लाटण्यात मग्न आहेत. दुसरीकडे, हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची डोळेझाक
नगरसेवक असो वा शासकीय अधिकारी, कोणालाही या वस्तीतील गरिबांच्या दुःखाशी देणेघेणे उरलेले नाही. श्रीमंत वस्त्यांमध्ये सुविधा पुरवल्या जातात, मग या ३-४ गल्ल्यांनीच काय पाप केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने बोअरवेल आणि पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास, नगर पंचायतच्या ‘केबिन संस्कृती’ला रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.



