जनुना गावात पाणीपुरवठा ठप्प ! ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !! : चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा !

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील जनुना येथील ग्रामपंचायतीच्या कथित निष्काळजीपणामुळे गावात मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याबाबत संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे दि २७ रोजी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत जनुना येथे विविध करांच्या माध्यमातून गावकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे मात्र, ही रक्कम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे (महावितरण) नळ योजनेच्या वीज बिलासाठी भरली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे थकीत बिलाच्या कारणास्तव महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीज कनेक्शन तोडल्याने गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.
गावात ग्रामपंचायतीच्या नळ योजनेशिवाय पाण्याचा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासोबतच ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत, १५ व्या वित्त आयोगाच्या निधी, सामान्य फंड, तांडा वस्ती योजना, ठक्कर बाबा योजना, पांदण रस्ते आदी विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने निधीचा गैरवापर केल्याची शंका व्यक्त करत, या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोन दिवसांत गावकऱ्यांना खुलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी विलास उत्तम आडे, पंकज सेतोष राठोड, अमोल रामराव राठोड, सचिन गोविंद राठोड, रविंद्र मंगू राठोड, राहुल पुंडलिक राठोड, सतिश राठोड, गणेश रामधन जाधव, स्वप्निल गोविंद राठोड, पंकज सुदाम जाधव, बालू मोतिराम राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.



