शहर

सत्तेत असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष? विरोधात असताना ‘एक दिवस स्वच्छता’, आता मात्र महागाव शहरात कचऱ्याचे ढिगारे


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीत काँग्रेसची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात एक दिवसाची स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलण्याचे काम केले होते. मात्र आता नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतरही शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या काळात शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची टेंडर प्रक्रिया निघून सुद्धा सफाई कामगार संख्या बळ खोळंबल्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या तीन नगरसेवकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला होता.
त्या वेळी शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय परिसरात साचलेला कचरा जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ करण्यात आला होता. या मोहिमेत दीपक आडे (माजी तालुकाप्रमुख), नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक गजानन साबळे, नगरसेविका आडे, संजय पाटे, विशाल पवार (खरेदी-विक्री संघ अध्यक्ष), विलास शेबे, रघुनाथ नरवाडे, विनोद पावडे, छायाताई खंदारे, मंचकराव खंदारे, निर्मला सोयाम, ज्ञानेश्वर काप्रतवार आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
मात्र सध्या महागाव शहरात जागोजाग कचऱ्याचे ढिगारे, न साफ केलेल्या नाल्या आणि शासकीय कार्यालय परिसरातही घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे डम्पिंग ग्राउंडसाठी जागा खरेदी करण्यात आली असली तरी तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने कचरा टाकण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नगरपंचायतीत भाजपची सत्ता आल्याला सुमारे एक महिना होत असताना कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण बैठक 12 मार्च 2026 रोजी होणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार का आणि महागाव शहर स्वच्छ करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button