फुलसावंगी येथे अवैध सावकारावर संयुक्त पथकाची धाड काटोले दांपत्याच्या घरातून स्टॅम्प, खरेदीखत व हिशोबाची कागदपत्रे जप्त; चार तास कारवाई

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे अवैध सावकारी प्रकरणात सहाय्यक निबंधक व सहकार विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी असलेल्या काटोले दांपत्याच्या घरी छापा टाकून विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. ११ मार्च २०२६) रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता काटोले यांच्या विरोधात अवैध सावकारी संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पुसद व महागाव येथील सहाय्यक निबंधक व सहकार अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी धाड टाकून तपासणी सुरू केली.
सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या कारवाईत स्टॅम्प पेपर, खरेदीखत, सौद्याची लेटरबुक, डायऱ्या तसेच हिशोबाची विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांवरून काही शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या शेती ताब्यात घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अंतिम तपास पूर्ण झाल्यानंतर सत्यस्थिती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कारवाईदरम्यान संतोष काटोले हे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत संबंधितांना जप्तीपत्रक देण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक निबंधक केशव मस्के, महागाव येथील सहकार अधिकारी काळभोर, जनार्दन साळवे, अश्विनी कांबळे, चेतन राठोड तसेच महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे, कैलास मोखाडे व श्रीकांत दुमारे यांनी सहभाग घेतला.
अवैध सावकारीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



