शहर

महागावमध्ये सार्वजनिक ओपन स्पेसवर अतिक्रमणाचा आरोप वॉर्ड क्र. १६ मधील नगरपंचायतीच्या जागेवर हालचाली; नागरिकांचे प्रशासनाला निवेदन


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मधील नगरपंचायतीच्या मालकीच्या खुल्या जागेवर (ओपन स्पेस) अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबत दि. 12 मार्च 2026 रोजी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वॉर्ड क्रमांक १६ मधील संबंधित जागा ही नगरपंचायतीच्या मालकीची मोकळी जागा असून ती गार्डन किंवा सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असल्याचे सांगितले जाते. मात्र काही स्थानिक व्यक्ती या जागेवर स्वतःचा मालकी हक्क सांगत अतिक्रमण करण्याच्या हालचाली करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भविष्यात तणाव निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही जागा नगरपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता असून महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (MRTP Act) नुसार अशा जागेवर कोणत्याही खासगी व्यक्तीला मालकी हक्क सांगता येत नाही. त्यामुळे या जागेवर कोणतेही बांधकाम अथवा धार्मिक अतिक्रमण होऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात सामाजिक वाद निर्माण होऊ नयेत म्हणून सदर जागेची तात्काळ मोजणी करून ती नगरपंचायतीची मालमत्ता असल्याचा फलक लावावा व जागेचे संरक्षण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित प्रशासनाकडेही पाठविण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वॉर्ड क्र. १६ मधील सुमारे ५० नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे गटनेते शैलेश कोपरकर यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button