शेतमजुरांनाही मिळणार २ लाखांचे अपघात विमा संरक्षण; आमदार कोहळीकर यांच्या पाठपुराव्याला यश

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
राज्य सरकारने शेतमजुरांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला असून, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ भूमिहीन शेतमजुरांनाही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी २०२५ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता. शेतात कष्ट करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे, सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
यापूर्वी ही योजना केवळ जमीनदार शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, परंतु आता मजुरांनाही हे सुरक्षा कवच मिळाल्याने ग्रामीण भागात समाधान व्यक्त होत आहे. “शेतकरी आणि शेतमजूर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कणा आहेत, त्यांच्या कुटुंबाला आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे,” असे मत आमदार कोहळीकर यांनी व्यक्त केले.



