शहर

महागावात देशी दारू विक्रीवर महिलांचा आक्षेप; दारूबंदी अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक १७ मध्ये असलेल्या देशी दारू दुकानांवर नियमांचे उल्लंघन करून अवैध विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. संबंधित दुकानदारांकडून खुल्या होलसेल दरात अवैध दारू विक्री केली जात असल्यासोबतच सकाळी नियमबाह्य वेळेत दुकाने उघडली जात असल्याने कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी महिलांनी दारूबंदी विभागाचे अधिकारी वाघ साहेब यांना नगरपंचायत कार्यालयात निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नगरपंचायत कार्यालयात नवीन देशी दारू दुकानाच्या परवान्यासंदर्भात प्रक्रिया राबवण्याबाबत चर्चा होत असल्याचेही सांगण्यात आले.
महिलांनी निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी अवैध मार्गाने दारू विक्री केली जात असून १८ वर्षांखालील मुलांनाही दारू विकली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दारूबंदी विभागाने तातडीने तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महागाव शहरात दारू विक्रीच्या नियमांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून दारूबंदी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button