महागाव नगरपंचायत राजकारण तापले; बंडखोर नगरसेवकांची हिरमोड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतमधील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वय सदस्य नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात नगरपंचायत अध्यक्षपदी रंजना दीपक आडे यांची निवड करण्यात आली. मात्र या सत्तांतरामध्ये काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपला साथ देणाऱ्या नगरसेवकांना कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांची मोठी हिरमोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या बंडखोर नगरसेवकांना समाधान देण्यासाठी सध्याच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा घेऊन ते पद काँग्रेसला देण्याची शक्यता असल्याची चर्चा नगरपंचायत वर्तुळात रंगू लागली आहे.
यापूर्वी काँग्रेस गटनेते शैलेश कोपरकर यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभापती निवडणुकीत भाग न घेतल्यामुळे काँग्रेसला कोणतेही पद मिळू शकले नाही. तसेच काँग्रेस गटनेते सुरेश कोपरकर यांनी पक्षाच्या वतीने काढलेल्या व्हीपचे उल्लंघन करून काही नगरसेवकांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बंडखोर काँग्रेस नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून हे प्रकरण जलदगतीने चालावे यासाठी नागपूर खंडपीठ उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाकडे महागाव नगरपंचायतीसह सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नगरपंचायत महागावसाठी अद्यापपर्यंत कोणताही ठोस निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांनंतर आता प्रत्यक्ष निधी कधी मिळणार, याकडे महागाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमध्ये नागरिकांचे लक्ष लागले आहे.



