महागाव तालुक्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक? दलाल-अधिकाऱ्यांच्या संगनमताची चर्चा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काही बँकांमध्ये कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विशेषतः युनियन बँक महागाव व मुडाणा शाखेत दलालांनी शेतकऱ्यांना “जुने-नवे कर्ज” करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दलालांनी भरून २० टक्क्यांपर्यंत वाढ करून पुन्हा नवीन कर्ज काढून दिले. या प्रक्रियेत प्रत्येक प्रकरणात सुमारे दहा हजार रुपये कमिशन दलाल व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दलालांच्या सांगण्यावरून जुने-नवे कर्ज केल्यामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी मानसिक तणावाखाली आले आहेत. या प्रकरणात दलालांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल केल्याचा आरोपही होत आहे.
या संदर्भात बँकेतील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू असून, नेमके किती शेतकऱ्यांनी “जुने-नवे” कर्ज केले याची माहिती बँकेकडून घेऊन शासनाला अहवाल सादर करण्याची मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी, अतुल शिंदे व स्वप्निल अडकिने यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. बँकेच्या परिसरात फिरणाऱ्या दलालांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या कर्जमाफी प्रकरणामुळे महागाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे.



