महागाव–आरे–रावी मार्गावर अवैध ट्रॅव्हल्सचा धनेश्वर चा हैदोस; रोजच ट्रॅफिक जाम

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव–आरे–रावी महागाव मार्गावर धनेश्वर अवैध ट्रॅव्हल्स वाहने रस्त्यातच उभी करून प्रवासी उचलत असल्याने दररोज ट्रॅफिक जाम होत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. प्रवासी घेण्याच्या नादात कुठेही गाडी थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ट्रॅव्हल्सकडे आवश्यक परवाने, वेळापत्रक आणि निश्चित थांबे नसताना खुलेआम प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र वाहतूक नियंत्रणासाठी जबाबदार असलेले उंबरखेड वाहतूक पोलीस यांच्याकडून मोठ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. उलट छोट्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे चित्र आहे, असा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
“अवैध प्रवासी वाहतूक सुरू असताना ट्रॅव्हल्सवर कारवाई का नाही?” असा सवाल छोट्या गाडीवाल्यांकडून उपस्थित केला जात आहे. महागाव शहरातही कुठेही गाडी थांबवून प्रवासी घेतल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून परवान्यांची तपासणी करावी, नियमबाह्य थांबे बंद करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.



