साई (ई) परिसरात अवैध विटभट्ट्यांचा धुमाकूळ; प्रशासनाचे दुर्लक्ष?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील साई (ई) परिसरात मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या कोणतीही शासकीय परवानगी न घेता सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित विटभट्ट्या महसूल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची आवश्यक कागदपत्रे व परवानगी न घेता चालवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
भट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर व प्रदूषण होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व त्वचारोग वाढल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तसेच शेतजमिनीतील सुपीक मातीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून विटा तयार केल्या जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. “महसूल प्रशासनाच्या आशिर्वादानेच हा अवैध व्यवसाय बिनधास्त सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित विभागाकडून तपासणी व दंडात्मक कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी विकास मिना यांनी तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी व परवानगीशिवाय सुरू असलेल्या सर्व विटभट्ट्या तात्काळ बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पर्यावरण व शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्रामस्थांच्या मते, जर प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.



