महागाव–करंजखेड रस्ता दोन वर्षांतच खड्डेमय; कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

महागाव प्रतिनिधी (संजय नागरगोजे)
महागाव तालुक्यातील करंजखेड–महागाव या महत्त्वाच्या मार्गाचे अवघ्या दोन वर्षांतच वाटोळे झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा डांबरी रस्ता आज खड्डेमय झाला असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अतिवृष्टीमुळे मार्गावरील पुलाचे नुकसान झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात एक लाख रुपयांमध्ये काम उरकून उर्वरित रकमेचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून सुमारे पाच लाखांचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाची दुरुस्ती दर्जाहीन झाल्याने तो पहिल्याच मोठ्या पावसात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलावरून तीन गावांचा संपर्क जोडला जात असल्याने येथील वाहतूक धोक्यात आली आहे. तरीही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी दखल घेत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींकडूनही अधिकाऱ्यांना जाब विचारला जात नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. करंजखेड–महागाव रस्ता तात्काळ दुरुस्त करून पुलाचे काम पारदर्शक पद्धतीने, दर्जेदार साहित्य वापरून करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व रस्ता जनतेच्या सेवेसाठी सुरक्षित व टिकाऊ स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.



