शहरशैक्षणिक

कैलासनगर शाळेत शिक्षकांची कमतरता

  • शिक्षक बदलीचा निर्णय ठरला वादग्रस्त; चिमुकल्यांचा पंचायत समितीत एल्गार

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : कैलासनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाची अचानक बदली केल्याच्या निषेधार्थ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समिती गाठत प्रशासनाला धारेवर धरले. “आमचे सर आम्हाला परत द्या!” अशा घोषणांनी गुरुवारी (ता. २६) उमरखेड पंचायत समिती परिसर दणाणून गेला.

९० विद्यार्थ्यांमागे केवळ तीन शिक्षक!

कैलासनगर (ता. उमरखेड) येथील जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत तब्बल ९० विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. याठिकाणी चार शिक्षक कार्यरत असताना शिक्षक कांगणे यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी समायोजित शिक्षक हाके यांनी स्वतः बदलीसाठी अर्ज दिल्याने त्यांना बदली देण्यात आली आणि कांगणे यांची उचल-बांगडी झाली.
या निर्णयामुळे शाळेत आता ९० विद्यार्थ्यांमागे केवळ तीनच शिक्षक उरले आहेत. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

पंचायत समितीतच भरली शाळा

संतप्त विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैलासनगर येथून मोर्चा काढत पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली आणि पंचायत समितीच्या प्रांगणातच प्रतिकात्मक शाळा भरवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

“बदली रद्द करा” – ठाम मागणी

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष रामराव राठोड, सुधाकर राठोड, हरी नाईक, कृष्णा जाधव, युवराज राठोड, पिंटू जाधव, कल्पना जाधव आदींसह पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत कांगणे यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा कैलासनगर येथेच रुजू करावे, अशी मागणी केली.

प्रशासन काय निर्णय घेणार?

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. चिमुकल्यांच्या निषेधातून एकच आवाज उमटला —
“शिक्षक द्या, शिक्षण वाचवा!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button