शहर

भरधाव बोलेरोची सायकलस्वारास जोरदार धडक; दूध विक्रेत्याचा मृत्यू

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमानपूर फाट्याजवळ भरधाव बोलेरो पिकअपने सायकलस्वारास जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात राजू रामधन राठोड (वय ४५) रा. सुकळी जहागीर यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू राठोड हे रोजप्रमाणे सुकळी जहागीर येथून दूध घेऊन सायकलने अमानपूरकडे जात होते. अमानपूर फाट्याजवळ पोहोचताच एमएच ०९ एफएल ६०६६ क्रमांकाच्या भरधाव बोलेरो पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की राठोड गंभीररीत्या जखमी झाले.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुकळी जहागीर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघातप्रकरणी संबंधित बोलेरो चालकाविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button