घरकुलच्या नावाखाली रेती तस्करी? माणकेश्वर घाटावर ट्रॅक्टरांची भाऊगर्दी; महसूल प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

मुख्य संपादक
उमरखेड : तालुक्यातील माणकेश्वर रेती घाटावर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती पुरविण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत आहे. ट्रॅक्टर वाहनांची सततची वर्दळ आणि रात्री-दिवस सुरू असलेली रेती उपसा कारवाई यामुळे गावकरी त्रस्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची तरतूद आहे. मात्र या योजनेचा आधार घेत काही रेती तस्करांनी माणकेश्वर घाटावर अक्षरशः डल्ला मारल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बिना पावती रेती उपसा व वाहतूक होत असल्याचेही आरोप आहेत.
गावकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
रेतीने भरलेले ट्रॅक्टर गावातून वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. धूळ, आवाज आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. “घरकुलच्या नावाखाली उघड तस्करी सुरू आहे,” असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
महसूल अधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा ठपका
स्थानिक ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. संबंधित रेती घाटांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तस्करांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.
गावकऱ्यांनी महसूल विभागाने तात्काळ संयुक्त पथकाची कारवाई करून अनधिकृत उत्खनन थांबवावे, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
माणकेश्वरसह तालुक्यातील इतर रेती घाटांवरही अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची चर्चा असून, प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.



