प्रशासन कुंभकर्णी झोपेत? अंगणवाडीच्या दारातच साचला नरक; चिमुकल्यांचा जीव टांगणीला!

/हिमायतनगर तालुका प प्रतिनिधी शेख खयुम/
हिमायतनगर: शहराच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सार्वजनिक आरोग्याची अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अंगणवाडीसारख्या पवित्र ठिकाणी, जिथे गरिबांची मुले शिक्षणाचे धडे गिरवतात, तिथेच एका धनदांडग्याने अनधिकृत म्हशींचा गोठा थाटून नरक निर्माण केला आहे. सर्वत्र पसरलेले शेण, सांडपाणी आणि त्यातून निघणारी भीषण दुर्गंधी यामुळे चिमुकल्या बालकांच्या आरोग्याशी क्रूर खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कायद्याला वाटाण्याच्या अक्षता:
जागरूक नागरिक शेख खय्यूम शेख महेबूब यांनी पुराव्यासह प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. निवासी क्षेत्रात आणि शाळेच्या १०० मीटर परिसरात गोठा चालवणे हा गंभीर फौजदारी गुन्हा असतानाही, संबंधित मालक कायद्याला जुमानत नसल्याचे दिसत आहे. आयपीसी कलम २६८ आणि २९० चे उघड उल्लंघन होत असूनही नगरपंचायत प्रशासन मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार:
“आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका,” असा सज्जड इशारा देत शेख खय्यूम यांनी मुख्याधिकाऱ्यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर विहित मुदतीत हा गोठा हटवून परिसराचे निर्जंतुकीकरण झाले नाही, तर थेट जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्च न्यायालयात (PIL) धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात असून, ते कारवाई करतात की राजकीय दबावाला बळी पडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



