Uncategorized

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी चेहऱ्याचे तोडले लचके, प्रकृती चिंताजनक दडगथर परिसरातील घटना

फुलसावंगी,शेतीच्या कामासाठी जात असलेल्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला.या हल्ल्यात अस्वलाने त्यांच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना महागाव तालुक्यातील दगडथर येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

उत्तम मारोती खराटे (४४) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तम खराटे हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आपल्या शेती कामासाठी घराबाहेर पडले होते. दगडथर ते निंगणूर रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी उत्तम खराटे यांनी आरडाओरडा सुरु केला. खराटे यांचा आवाज ऐकून परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेताच अस्वलाने तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डी. के. मुनेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव, ए. एस. चहाणकर क्षेत्र सहायक, एल. डी. जाधव वनरक्षक चिल्ली यांनी घटनास्थळाची पाहणी करून रितसर पंचनामा केला आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवावी आणि जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button