शहर

निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यांवर कारवाई शून्य; कार्यकारी अभियंता ठेकेदाराच्या दावणीला?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये स्वप्निल अडकिने यांच्या घरापासून ते संभाजी महाराज चौकापर्यंत करण्यात आलेला सिमेंट रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याची लेखी तक्रार नगरपंचायतचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते शाखा भरवाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता सुषमा बांद्रे यांनी दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुसद यांना कार्यालयीन पत्र पाठवले. मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली नाही, तसेच निकृष्ट कामावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.
इतकेच नव्हे, तर प्रभाग क्रमांक १४ मध्ये दर्ग्यापासून संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत तसेच धरणकर ते किराणा लाईन या ठिकाणी करण्यात आलेले रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही कामे डमी ठेकेदारामार्फत करण्यात आल्याचा आरोप असून, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महागाव हे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र समोर येत आहे.
लेखी तक्रार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र आणि नागरिकांच्या तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ‘कार्यकारी अभियंता ठेकेदाराच्या दावणीला असल्याचे चित्र’ महागाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास नगरपंचायत उपाध्यक्ष शाखा भरवाडे (शिवसेना) आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button