प्रशासकीय अनास्थेचे ‘भूत’ उतरवण्यासाठी तरुणाचा अघोरी पवित्रा; ‘अंनिस’कडे थेट जादूटोण्याची परवानगी मागितली

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे त्रस्त झालेल्या एका युवकाने प्रशासकीय ढिसाळपणावर उपरोधिक पण तीव्र प्रहार करत आगळावेगळे पत्र लिहून संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गावाजवळ येताच अचानक का थांबते? आणि त्याच ठिकाणी अपघातांचे सत्र का सुरू होते?, या प्रश्नाचे उत्तर विज्ञान व प्रशासन देऊ शकत नसल्याने आता ‘अघोरी मार्गाचा’ अवलंब करावा लागेल, असा टोला या पत्रातून लगावण्यात आला आहे.
हरीश भीमराव कामारकर या युवकाने थेट महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) अध्यक्षांना पत्र लिहून, येत्या १६ फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर ‘अपघाती भुताचा’ बंदोबस्त करण्यासाठी अघोरी पूजा करण्याची परवानगी मागितली आहे.
या पत्रात कामारकर यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रशासनावर टीका केली आहे. एकविरा देवीच्या फलकाजवळ, जिथे महामार्ग आणि गावचा रस्ता एकत्र येतो, त्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमागे प्रशासकीय दुर्लक्ष नसून एखादे ‘शक्तिशाली भूत’ कार्यरत असावे, अशी खात्री गावकऱ्यांची झाल्याचे त्यांनी उपरोधाने नमूद केले आहे.
हे भूत इतके प्रभावी आहे की त्याने महामार्ग प्राधिकरणाची संपूर्ण यंत्रणा संमोहित केली असून, त्या अधिकाऱ्यांना येथे सांडणारे रक्त व लोकांचा आक्रोश दिसत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही अघोरी पूजा कोणत्याही मांत्रिकामार्फत न करता महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या हस्तेच पार पाडावी, अशी त्यांची मागणी आहे.
अधिकाऱ्यांच्या अंगात शिरलेली ‘आळसाची बाधा’ उतरावी, त्यांच्या टेबलांवर पडलेल्या फाईल्सवरील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चक्क फाईल्सवरून लिंबू उतरवण्याचा अजब पण मार्मिक उपाय त्यांनी सुचवला आहे.
हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यातील बोचऱ्या भाषेने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासन जिवंत असतानाही सामान्य नागरिकांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करत असतील, तर अशा ‘चमत्कारांची’ गरज भासते, असे सांगत कामारकर यांनी व्यवस्थेच्या संवेदनाशून्यतेवर बोट ठेवले आहे.
आता या अभिनव पत्राची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरण हिवरा (संगम) येथील रखडलेला बायपास पूर्ण करणार का, की हा उपहासही प्रशासनाच्या पचनी पडणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
३५१ किमी महामार्गावर केवळ हिवरा बायपासचे भिजत घोंगडे
नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागामार्फत नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे ३५१ किमी लांबीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, संपूर्ण महामार्गावर फक्त हिवरा (संगम) येथील बायपासचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
या प्रकरणामागे केवळ प्रशासकीय उदासीनता जबाबदार असून, येथे अजून किती बळी घेतले जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी महामार्ग प्राधिकरण जबाबदार धरून कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.



