महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली? घरकुल लाभार्थी पाच ब्रास वाळूपासून वंचित

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात प्रधानमंत्री/राज्य घरकुल योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असली, तरी शासनाने देण्याचे आदेश असलेली पाच ब्रास वाळू अद्याप लाभार्थ्यांना मिळालेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे अनेक घरकुलांची कामे रखडली असून लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कासाळबेळ येथील नागरिकांनी तक्रार करताना सांगितले की, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्यात टाळाटाळ केली जात आहे. शासन व महसूल मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, वरुडी येथील घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, यासाठी नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे फिटनेस व इन्शुरन्स नसलेले टिप्पर खुलेआम वाळू वाहतूक करताना दिसत आहेत, मात्र शासनाच्या योजनेतील गरीब लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे महसूल मंत्र्यांच्या आदेशाला महसूल अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे का? असा सवाल महागाव तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकारी यावर कारवाई करतील का, आणि घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाळू उपलब्ध करून दिली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



