उमरखेड–पुसद राज्यमार्गावर प्रशासनाचा मृत्यूखेळ; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : उमरखेड–पुसद या अत्यंत वर्दळीच्या राज्यमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असले तरी हे काम विकासाचे नव्हे, तर थेट मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदार नियोजनामुळे वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या निष्काळजीपणाचा स्फोट गुरुवारी सायंकाळी झाला, जेव्हा वसंतनगरजवळील वळणावर एक स्विफ्ट डिझायर कार थेट रस्त्याखालील खोल खड्यात कोसळली.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढावी लागली. मात्र प्रश्न असा आहे की, जर जीवितहानी झाली असती, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
वसंतनगरजवळील वळणावर एका बाजूचा रस्ता तयार करून दुसऱ्या बाजूला वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद, धोकादायक आणि अपूर्ण तात्पुरता मार्ग सोडण्यात आला आहे. हा मार्ग अचानक संपतो आणि पुढे खोल खड्डा असल्याने चालकाचा किंचित अंदाज चुकला तरी वाहन थेट मृत्यूच्या खाईत जात आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून तरीही संबंधित विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
काम सुरू असलेल्या रस्त्यावर नियमानुसार धोका दर्शवणारे फलक, वळण सूचक चिन्हे, रिफ्लेक्टर किंवा वेगमर्यादा फलक असणे बंधनकारक आहे. मात्र संपूर्ण मार्गावर एकही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारक पूर्णपणे अंधारात प्रवास करत आहेत. रस्ता खोदल्यामुळे उडणाऱ्या धुळीत आणि अपुऱ्या प्रकाशात हा मार्ग रात्रीच्या वेळी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
वसंतनगर येथील अपघाताने कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा, हलगर्जीपणा आणि प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून धोका सूचक फलक बसवावेत, अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. दोषी कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.



