Uncategorized

तीन वर्षांची झोप अखेर फुटली!

  • ‘दैनिक आत्ताच एक्सप्रेस’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच मुळावा–भांबरखेडा रस्त्याचे काम सुरू

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :- मुळावा ते भांबरखेडा या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर प्रकाशझोत पडला असून, तब्बल तीन वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम ‘दैनिक आत्ताच एक्सप्रेस’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच सुरू झाल्याने प्रशासन व ठेकेदारांची उदासीनता उघड झाली आहे. सन २०२३ मध्ये तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही हा रस्ता आजपर्यंत पूर्ण न होणे ही केवळ निष्काळजी नव्हे, तर नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारी बाब असल्याचा संतप्त आरोप होत आहे.
डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असतानाही ठेकेदार व संबंधित यंत्रणांनी कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी मुळावा, पोफाळी व परिसरातील नागरिकांना खड्डेमय, अर्धवट व निकृष्ट रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. दररोज अपघात घडत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र होते.
इतक्या मोठ्या निधीनंतरही रस्ता अपूर्ण राहणे हे ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचे आणि यंत्रणांच्या संरक्षणाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक सांगतात. निकृष्ट काम, अपूर्ण डांबरीकरण आणि कुठल्याही सुरक्षाव्यवस्थेअभावी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरला होता.
मात्र या गंभीर प्रश्नावर ‘दैनिक आत्ताच एक्सप्रेस’ने आवाज उठवताच, संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांची झोप उडाली असून अखेर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावरून एकच प्रश्न उपस्थित होतो — जर बातमी आली नसती, तर रस्त्याचे काम कधी सुरू झाले असते का?
नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली असून, केवळ काम सुरू करून चालणार नाही तर दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button