उमरखेडचा पाणीपुरवठा कोलमडलेला; नगरपालिकेतील दुर्लक्ष व भ्रष्टाचाराच्या चर्चेने खळबळ

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : उमरखेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः कोलमडलेली असून, दर दहा–पंधरा दिवसांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने पाणीपुरवठा खंडित होणे हे नागरिकांसाठी नित्याचे झाले आहे. कधी व्हॉल्व्ह खराब, कधी व्हॉल्व्हमधून पाणी गळती, तर कधी लाईटची विशेष व्यवस्था असूनही सतत वीजपुरवठा खंडित होतो—अशा कारणांची यादीच मोठी आहे.
अल्टरनेट म्हणून दोन-दोन मोटारी उपलब्ध असताना प्रत्यक्षात एकच मोटार कार्यान्वित ठेवली जाते. परिणामी मोटार बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो. पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, पाईपलाईन व व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या नावाखाली मजबूत सिमेंट काँक्रीटचे रस्ते कोठे ना कोठे सतत फोडले जात आहेत. एकदा रस्ता फोडला की दुरुस्ती रखडते आणि नागरिकांना धुळ, वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका सहन करावा लागतो.
पाणीपुरवठा विभागाचा इंजिनियर नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर कधीच दिसत नसल्याची चर्चा असून, तो नेमके काय काम करतो, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पाईपलाईन दुरुस्ती किंवा एखादा खड्डा खोदण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लावला जातो, जे काम एका दिवसात होऊ शकते, ते चार दिवस लांबवून मजुरांचा चार दिवसांचा पगार काढला जात असल्याचा आरोप होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिकेचे नगरसेवक, मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती आणि विभागातील इंजिनियर हे कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. खुर्चीवर बसून आदेश दिले जात असून, प्रत्यक्ष कामाची जबाबदारी काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यावर चालते. याच पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची खात्रीदायक चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे, पाणीपुरवठा सभापती आणि कार्यालयातच रमणारे इंजिनियर कधी तरी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन चौकशी करून सत्य परिस्थितीची खात्री करतील का, असा संतप्त सवाल उमरखेडकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.



