ग्रामीण विद्यार्थिनीच्या स्वावलंबनाला बळ; सानिका उबाळेला शिलाई मशीन भेट देत रोजगाराचा मार्ग मोकळा

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने मिलिंद महाविद्यालय, मुळावा येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी सानिका उबाळे हिने रोटरी क्लब उमरखेड यांच्या माध्यमातून उमरखेड येथे एक महिना शिलाई मशीन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. तिच्या कुटुंबासाठी असलेली तळमळ आणि आत्मनिर्भर होण्याची जिद्द पाहून मिलिंद महाविद्यालयातील प्रा. ज्योती काळबांडे व प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी तिला शिलाई मशीन भेट देत तिच्या रोजगाराचा मार्ग खुला करून दिला.
हा कार्यक्रम दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. पवार होते. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयमाला लाडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. ज्योती काळबांडे यांनी केले. यावेळी सानिका उबाळे यांच्या आई सविता उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना, “मिलिंद महाविद्यालय मुळावा हे ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचे महाविद्यालय असून येथे राबविले जाणारे उपक्रम विशेषतः मुलींसाठी वरदान ठरत आहेत. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण मुलींना शिक्षणासोबत आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत आहे,” असे मत व्यक्त करत महाविद्यालयाचे आभार मानले.
याच कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘भारताच्या संविधानासमोरील आव्हाने’ या विषयावरील निबंध स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. ‘हर घर संविधान’ जनजागृतीचा उद्देश या उपक्रमामागे होता. तसेच सत्र २०२४–२५ मध्ये रेड रिबन क्लबद्वारे घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती श्रुतिका देशमुख हिला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तक भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने रेड रिबन क्लब समन्वयक प्रा. ज्योती काळबांडे यांनी हा उपक्रम राबविला. कार्यक्रमाचे आभार सागर धुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सानिका उबाळे, अंजली उबाळे, श्रुतिका चंद्रवंशी, क्रांती कांबळे, प्रिती जाधव, रानी मनवर, सागर धुळे, रुपेश सोळंके, नितीन मनवर, सुजाता काशिंदे, शीतल बलखंडे, नंदिनी चव्हाण, समिक्षा बरडे, रेणुका कदम, जानकी कदम आदी विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणासोबत स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



