शिवरायांचा पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; पेट्रोल पंपामुळे सौंदर्यकरण रखडले – नगर प्रशासन मौनात!

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :- छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. नवनिर्वाचित जनशक्ती पॅनलच्या नगर प्रशासनाकडून महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नेमके केव्हा होणार, हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी असलेला भारत पेट्रोलियम कंपनीचा धोकादायक सारडा पेट्रोल पंप.
सदर पेट्रोल पंपाची लीज संपून जवळपास सहा महिने उलटून गेले असतानाही तो आजही अवैधरित्या सुरू आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणाला व परिसराच्या विकासाला हा पेट्रोल पंप मोठा अडथळा ठरत असतानाही महसूल प्रशासन व नगर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या विरोधात शिवप्रेमींनी आंदोलन केले. मात्र दुर्दैवाने या आंदोलनात शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले, काहींना तुरुंगवासही भोगावा लागला, तरीही प्रशासनाने पेट्रोल पंप हटवण्याबाबत आजतागायत कोणतीही हालचाल सुरू केली नाही. नगर प्रशासन देखील केवळ “बघ्याची भूमिका” घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, सारडा पेट्रोल पंपाची लीज वाढवायची की नाही, याबाबतची सुनावणी 30 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यासमोर निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून ठोस भूमिका घेणे अत्यंत आवश्यक असताना, सत्तेत असलेल्या जनशक्ती पॅनलच्या नेतृत्वाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, उबाठा व विदर्भ मराठवाडा आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलचा दणदणीत विजय झाला असून नगराध्यक्षा सौ. तेजश्री संतोष जैन व त्यांच्या नगरसेवकांकडे कायदेशीर सत्ता आहे. अशा परिस्थितीत 30 जानेवारीच्या सुनावणीपूर्वी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून “सारडा पेट्रोल पंप कायमस्वरूपी हटवण्याचा ठराव” घेणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बांधकाम सभापती प्रकाश शिकारे यांनी नगराध्यक्षा सौ. तेजश्री संतोष जैन यांच्या परवानगीने मुख्याधिकाऱ्यांना प्रस्ताव देऊन विशेष सर्वसाधारण सभा गठीत करावी, जेणेकरून सुनावणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत ठराव सादर करता येईल आणि पेट्रोल पंप हटवण्यास कायदेशीर बळ मिळू शकेल, अशी भूमिका नागरिक व शिवप्रेमींमधून मांडली जात आहे.
याबाबत काँग्रेस नेते साहेबराव कांबळे, नंदकिशोर अग्रवाल, तातू देशमुख, राम देवसरकर,
उबाठा नेते अॅड. बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, प्रशांत पत्तेवार, संदीप ठाकरे,
विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे नेते अॅड. संतोष जैन, ईनायत उल्ला जनाब, बाळासाहेब नाईक,
तसेच जनशक्ती पॅनलचे नेते गोपाल अग्रवाल यांच्यासह असंख्य शिवभक्तांनी
नगराध्यक्षा सौ. तेजश्री संतोष जैन व बांधकाम सभापती प्रकाश शिकारे यांनी तात्काळ भूमिका घ्यावी, अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवरायांचा पुतळा आधी, की अवैध पेट्रोल पंप आधी?
नगर प्रशासन जागे होणार की इतिहास जबाबदार धरून बसणार?
30 जानेवारीपूर्वी नगर प्रशासन पाऊल उचलते की नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



