उमरखेड तालुक्यात युरियाचा कृत्रिम तुटवडा; कृषी यंत्रणेच्या अपयशामुळे शेतकरी संतप्त

सहसंपादक शेख मुजाहिद
मरखेड तालुक्यात रब्बी हंगाम सुरू असताना निर्माण झालेला युरियाचा तुटवडा हा नैसर्गिक नसून कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व कृषी मंत्रालयाच्या अपयशातून तयार झालेला कृत्रिम तुटवडा असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खत कंपन्या आणि कृषी विभागाच्या संगनमतामुळे मोठ्या साठेबाजांना मोकळे रान मिळाले असून त्याचा थेट फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. या संपूर्ण गोंधळाला कृषी दुकानदार किंवा वाहनचालक जबाबदार नसून, खरे दोषी शासन यंत्रणाच आहेत, हे शेतकरी वर्गाने स्पष्ट केले आहे.
कागदोपत्री युरियाचा साठा उपलब्ध असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात गोदामे रिकामी असल्याचे चित्र दिसत आहे. किरकोळ दुकानदारांवर अन्यायकारक युरिया लिंकिंगची सक्ती लादून शेतकऱ्यांची उघड लूट होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वेळेवर युरिया न मिळाल्यास रब्बी पिकांची वाढ खुंटून मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, त्याची संपूर्ण जबाबदारी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व कृषी मंत्रालयावरच राहील, असा संतप्त इशारा उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी तात्काळ युरिया नत्राची उपलब्धता करून देण्याची मागणी करताना स्पष्ट केले आहे की, जर लवकरात लवकर युरिया उपलब्ध करून देण्यात आला नाही, तर तालुक्यात तीव्र आंदोलन, कृषी कार्यालय घेराव, रास्ता रोको यांसारख्या संघर्षात्मक मार्गांचा अवलंब करण्यात येईल. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संपूर्ण जबाबदारी शासनयंत्रणेवरच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.



