शहर

महागाव शहरात अवैध रेती-मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचा सुसाट वेग; नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासन कारवाई करणार का?


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरात अवैध रेती व मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर बाजारपेठ, बाजार लाईन व बसस्टॉप रोडवरून बेसुमार वेगात सुसाट धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या शहराच्या मध्यवर्ती भागातून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरांमुळे व्यापारी, महिला, वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे अनेक ट्रॅक्टरांना नंबर प्लेट नसून, काही ट्रॅक्टर बिगर परवाना (लायसन्स) धारक चालकांकडून चालवले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. महागाव व महागातले बुद्रुक परिसरातील शाळकरी विद्यार्थी रस्त्याने ये-जा करताना या ट्रॅक्टरांमुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत मोठा अपघात झाल्यास जीवितहानी अटळ असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
यापूर्वी महागाव परिसरात रस्ते अपघातात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काल-परवा करंजखेड येथील रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा अपघातात मृत्यू झाला. या घटनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक कारवाई झालेली दिसत नाही, ही बाब अधिकच गंभीर ठरत आहे.
अवैध उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची नोंदणी नसणे आणि वाहतूक नियमांची पायमल्ली हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना महसूल प्रशासन व पोलीस विभाग नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. ट्रॅक्टरांवर वेगमर्यादा लागू करणे, नंबर प्लेट व चालक परवाना तपासणी, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हे प्रशासनासमोर आता अत्यंत गंभीर आव्हान बनले आहे.
जर वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का, असा संतप्त सवाल महागाव शहरातील नागरिक, व्यापारी व पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. अवैध रेती-मुरूम वाहतुकीवर तात्काळ बंदी व धडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button