महागाव तालुक्यात सौर ऊर्जा प्लेट चोरी; धारमोहा येथे शेतकऱ्याच्या शेतात चोरट्यांचा डल्ला

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील धारमोहा येथे शेतकरी गणेश मसाजी ढगे यांच्या शेतातून सौर ऊर्जा प्लेट चोरी झाल्याची घटना 21 जानेवारी 2026 रोजी घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री शेतात घुसून सौर ऊर्जा प्लेट चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ढगे यांचे शेत सर्वे क्रमांक 25 पैकी 2 मध्ये असून, कोठारी–बेलदरी मार्गालगत असलेल्या शेतात ओसवाल कंपनीच्या सौर ऊर्जा प्लेट बसवण्यात आल्या होत्या. मात्र चोरट्यांनी संधी साधून डल्ला मारल्याची तक्रार त्यांनी महागाव पोलीस स्टेशनला दिली आहे.
यापूर्वी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बळी खंदारे यांच्या शेतातील सौर ऊर्जा प्लेटही चोरीला गेल्या होत्या. त्यांनी देखील महागाव पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास लवकरच करण्यात येईल व आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी एडकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जेच्या साहित्याची वारंवार चोरी होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, 50000 रुपयाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे .पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.



