हिमायतनगर नगर पंचायतीचा ‘कचरा’ कारभार; चिमुकल्यांच्या नशिबी शिक्षणाऐवजी नरकयातना!

’स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाओ’ घोषणांचा उडाला फज्जा; वॉर्ड क्र. १३ मधील अंगणवाडी बनली मृत्यूचा सापळा!
हिमायतनगर (प्रतिनिधी ता शेख खयुम खूरेशी):
सरकार कागदावर ‘डिजिटल इंडिया’च्या बाता मारत असताना, हिमायतनगरमध्ये मात्र प्रशासनाच्या निर्लज्जपणामुळे उद्याच्या भविष्याची म्हणजेच चिमुकल्यांची माती होत आहे. वॉर्ड क्रमांक १३ मधील अंगणवाडी केंद्राची अवस्था पाहिल्यास, हे शिक्षणाचे मंदिर आहे की ‘कचरा डेपो’, असा प्रश्न पडतो. स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या या केंद्रात चिमुकल्यांना दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यात बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
जर्जर इमारतीमुळे मृत्यूचे सावट!
फोटोमध्ये स्पष्ट दिसत असल्याप्रमाणे, अंगणवाडीच्या इमारतीला आरपार मोठे भगदाड (क्रॅक) पडले आहे. ही इमारत कधीही पत्त्यासारखी कोसळू शकते. भिंतींना गेलेले तडे आणि उखडलेले सिमेंट पाहून पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. “एखाद्या बालकाचा बळी गेल्यावरच कुंभकर्णी झोपेत असलेले नगर पंचायत प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता विचारला जाआहे.
नाऱ्यांचा फार्स: कुठे आहे ‘स्वच्छ भारत’?
पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे गुणगान गाणारे अधिकारी या अंगणवाडीकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. प्रवेशद्वारावरच प्लास्टिक, सडलेला कचरा आणि घाणीचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात डास आणि डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला आहे. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चे नारे द्यायचे आणि दुसरीकडे आपल्याच लेकींना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत बसायला लावायचे, हा कुठला
मुख्याधिकारी साहेब, एकदा इथे येऊन बघाच!
एसी केबिनमध्ये बसून फाइल्सवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना या चिमुकल्यांचे हाल दिसत नाहीत का? कचऱ्याची गाडी वॉर्ड क्र. १३ मध्ये का फिरकत नाही? की जाणीवपूर्वक या गरीब मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे? जर येत्या काही दिवसांत या जागेची स्वच्छता झाली नाही आणि जर्जर इमारतीचे ऑडिट करून ती दुरुस्त केली नाही, तर संतप्त पालक नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.



