वेणी येथे अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वेणी परिसरात अवैध मुरूम उत्खनन खुलेआम सुरू असून, महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार चालू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. टेकड्या व डोंगर अक्षरशः खोदून भुईसपाट करण्याचा सपाटा सुरू असतानाही, संबंधितांवर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब चिंतेची ठरत आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, वेणी येथील दत्त मंदिर परिसरातील संपूर्ण टेकडी मुरूम काढून अवैधपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. धार्मिक स्थळाजवळच मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाले असतानाही महसूल प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय अधिक बळावला आहे.
या अवैध उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक टेकड्या नष्ट होत असून, पावसाळ्यात माती धूप, जलस्रोतांवर परिणाम व पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जड वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून शेतजमिनींनाही फटका बसत आहे.
अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि नुकसानभरपाई वसूल करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, हा विषय आता तालुक्यातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.



